पूर्ण संख्या - मुलभूत क्रिया
नमस्कार गणितमित्रांनो,
आज आपण अंकगणित यातील दुसरा महत्वाचा भाग म्हणजेच पूर्ण संख्यांवरील मूलभूत क्रिया. या घटकाचा अभ्यास पाहूया. यातील उपघटक पुढीलप्रमाणे
-
बेरीज
-
वजाबाकी
-
गुणाकार
-
भागाकार
-
विभाज्यातेच्या कसोट्या
-
सरासरीची बेरीज भागिले एकूण घटक.
बेरीज व वजाबाकी :-
- बेरीज/ वजाबाकी ही क्रिया यासंबंधी बऱ्याचदा प्रश्न विचारताना आडव्या मांडणीमध्ये विचारले जातात.
- आडव्या मांडणीतील उदाहरणाचे उभ्या मांडणीमध्ये मांडणी करून गणित सहजपणे सोडू शकतात. मांडणी करताना स्थानानुसार संख्या मांडून घ्याव्यात.
- मांडणी करण्यात चूक झाल्यास उत्तर चुकीचे येते.
- हातचा असल्यास न विसरता घ्यावा.
- शाब्दिक उदाहरण नीट वाचून क्रिया समजून घ्यावी. त्यात बेरीज/ वजाबाकी ही क्रिया असेल तर व्यवस्थितपणे उभ्या मांडणीत मांडून उदाहरण सोडवावे.
-----------------------------------------------------------
- अत्यंत महत्वाचे – शाब्दिक उदाहरणात दोन संख्यांची बेरीज दिलेली असते. व त्यातील दोन संख्यांचा फरक/ मोठी संख्या/लहान संख्या दिलेली असते. अशा वेळी एकूण बेरजेतून वजाबाकी करावी.
-----------------------------------------------------------
- बेरीज व वजाबाकी या दोन्ही घटकांची एकमेकांसोबत जोडलेली क्रिया होते हे लक्षात घ्यावी.
– नवोदय परीक्षा -२०१४ मधील एक उदाहरण पाहूया.
- दोन संख्यांची बेरीज ९,८७,६५४ आहे. एक संख्या दुसऱ्यापेक्षा २०,१०० मोठी असेल. तर मोठी संख्या कोणती असेल?
या उदाहरणांमध्ये दोन संख्यातील फरक दिलेला आहे. एक संख्या क्ष मानली तर दुसरी संख्या क्ष + २०१०० येईल
म्हणजे क्ष + क्ष + २०१०० = ९,८७,६५४ येईल
२ क्ष = ९,८७,६५४ -२०,१००
२ क्ष = ९,६७,५५४
क्ष = ९,६७,५५४ भागिले २
पहिली संख्या = ४,८३,७७७ येईल तर
दुसरी संख्या ४,८३,७७७ + २०१००=५,०३,८७७ येईल.
---------------------------------------------------------------------
याप्रमाणेच एक उदाहरण २०१८ मध्ये सुद्धा विचारले गेले होते.
विद्यार्थ्यांना याबाबत सोपे सूत्र बनवायला सांगायचे
एकूण बेरीज वजा संख्यांचा फरक भागिले २
(एकूण बेरीज - संख्यांचा फरक) / २
यातून लहान संख्या मिळेल. फरक मिळवला की दुसरी संख्या सुद्धा मिळेल.
---------------------------------------------------------------------------
- बेरजेमध्ये अजून एका प्रकारे प्रश्न विचारला जातो .
मोठ्यात मोठी/ लहानात लहान पाच अंकी संख्या व मोठ्यात मोठी/ लहानात लहान चार अंकी संख्या यांची बेरीज/ वजाबाकी किती होईल?
----------------------------------------------------------------------------------------------
-
गुणाकार :-
- गुणाकार या क्रियेत एकावरून अनेक वस्तूंची किंमत काढणे याप्रमाणे उदाहरणे येतात.
- कोणत्याही संख्येला शून्यने गुणले तर गुणाकार शून्य येतो.
- बऱ्याचदा पदावली सारखे उदाहरण दिले जातात.
उदा. १५० X ० X १५ X ४ = ?
- या उदाहरणात गुणाकार करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी की इथे शून्याचा गुणाकार दिसतो म्हणजे या संपूर्ण उदाहरणाचे उत्तर शून्य येणार आहे.
-----------------------------------------------------------
-नवोदय परीक्षा २०१५ मध्ये गुणाकारासंबंधी एक प्रश्न आला, तो पाहूया.
- शुक्रवारी १२५० लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. सगळे मिळून या दोन दिवसात लोक किती लोक सर्कस बघायला गेले?
- या क्रियेत शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी गेल्यामुळे १२५० X ३ करून येणाऱ्या गुणाकारात शुक्रवारच्या लोकांची संख्या मिळवायची आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-
भागाकार :-
भागाकार या घटकांमध्ये भागाकार करत असताना आपल्याला भागाकाराचे काही नियम माहिती असणे आवश्यक आहे.
कोणत्याही संख्येला एक ने भागले तर उत्तर तीच संख्या येते.
- भागाकारअपूर्णांकाच्या स्वरूपात मांडलेला असेल तर अंशस्थानी असलेली संख्या ही भाज्य असते तर छेदस्थानी असलेली संख्या ही भाजक असते.
-अनेकदा वस्तूंची किंमत दिली असता त्यावरून एका वस्तूची किंमत काढण्यात काढण्यासाठी आपल्याला भागाकार या क्रियेचा वापर करावा लागतो.
- भागाकाराच्या क्रिये संदर्भात आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून पूर्ण संख्यांवरील क्रिया करत असताना आपल्याला उदाहरण जलद गतीने सोडवता येते.
-
विभाज्यातेच्या कसोट्या:-
# २ ची कसोटी (Divisibility By २) :-
ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजेच शेवटी ०,२,४,६ किंवा ८ यापैकी एखादा अंक असतो तर त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो.
उदा : २,४६८ ; ७,२९० ; १०,५२४
वरील सर्व उदाहरणांमध्ये संख्यांच्या शेवटी म्हणजेच एकक स्थानी ८, ० आणि ४ या संख्या दिसून येतात म्हणून या संख्येला दोन ने निशेष भाग जातो.
------------------------------------------------------
# ३ ची कसोटी (Divisibility By ३) :-
कोणत्याही संख्येच्या बेरजेला तीन ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला ३ ने भाग जातो
उदा : ४२१८
= ४+२+१+८
= १५
= १५/३ = ५
१५ या संख्येला ३ ने नि:शेष भाग जातो म्हणून ४२१८ या संख्येला देखील ३ ने पूर्ण भाग जातो.
-----------------------------------------------------------
# ४ ची कसोटी (Divisibility By ४):-
जेव्हा एखाद्या संख्येच्या शेवटच्या दोन म्हणजेच एकक व दशक स्थानच्या अंकांना ४ ने भाग जात असेल तर त्या संख्येला ४ ने पूर्ण भाग जातो.
उदा : ७२७२८ या संख्येच्या शेवटी २८ आहे २८ ला ४ ने पूर्ण भाग जातो म्हणून ७२७२८ या संख्येला देखील ४ ने पूर्ण भाग जाईल.
-------------------------------------------------
# ५ ची कसोटी (Divisibility By ५):-
ज्या संख्येच्या एककस्थानी ० किंवा ५ ह्या संख्या येतात अश्या संख्यांना ५ ने पूर्ण भाग जातो.
उदा: ५२४५, ८३२० या दोन संख्यांच्या एकक स्थानी ५ व ० या संख्या आहे म्हणून या दोन्ही संख्यांना ५ ने पूर्ण भाग जातो.
५२४५ / ५ = १०४९
८३२० / ५ = १६६४
-------------------------------------------------
# ६ ची कसोटी (Divisibility By ६):-
कोणत्याही संख्येला २ व ३ ने निःशेष भाग जात असेल तर त्या संख्येला ६ ने निःशेष भाग जातो.
उदा: ७८४२३०
- ७८४२३० या संख्येच्या शेवटी ० आहे म्हणून २ ने पूर्ण भाग जातो
- ७८४२३० या संख्येतील प्रत्येक अंकांची बेरीज करून (७+८+२+३+० = २४) येणाऱ्या २४ ला ३ ने पूर्ण भाग जातो म्हणून ७८४२३० या संख्येला ३ ने पूर्ण भाग जातो.
म्हणून ६ च्या कसोटीनुसार ७८४२३० या संख्येला २ आणि ३ ला पूर्ण भाग जातो म्हणून ६ ने पूर्ण भाग जातो.
-----------------------------------------------------------------
# ७ ची कसोटी (Divisibility By ७) :-
पद्धत१: जर दिलेल्या संखेच्या शेवटच्या तीन अंकांनी तयार झालेल्या संख्येतून पहिल्या तीन अंकांची संख्या वजा करून येणाऱ्या वजाबाकी च्या उत्तराला जर ७ ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला ७ ने पूर्ण भाग जातो.
उदा: ७४०७८२
वरील संख्येचे शेवटचे ३ अंक = ७८२
वरील संख्येचे सुरवातीचे ३ अंक = ७४०
आता या शेवटच्या तीन अंकामधून सुरवातीचे तीन अंक वजा करू
७८२-७४० = ४२
येणारे उत्तर आहे ४२ या ४२ ला ७ ने भागीतल्यास
४२/७ = ६
४२ ला ७ ने पूर्ण भाग गेला म्हणून ७४०७८२ या संखेला देखील ७ ने पूर्ण भाग जातो.
पद्धत २: दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या म्हणजेच शेवटच्या अंकाची दुप्पट करून ही दुप्पट उर्वरित अंकातून वजा करावी. तयार झालेल्या संख्येस ७ ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येलादेखील ७ ने पूर्ण भाग जातो.
उदा.७४०७८२
वरील उदाहरणात शेवटचा अंक आहे २ आता या २ ची दुप्पट केल्यास उत्तर येईल ४
आता या ४ मधून उरलेली संख्या वजा करूया ७४०७८- ४ = ७४०७४
आता येणाऱ्या उत्तरावर परत हीच कसोटी वापरूया
एकक स्थानच्या अंकाची दुप्पट ४*२ = ८ आता या ८ मधून उव्ररीत संख्या वजा करूया
७४०७-८ = ७३९९
आलेल्या संख्येवर परत हीच कसोटी लाऊ
एकक स्थानच्या अंकाची दुप्पट ९*२ =१८ आता या १८ मधून उर्वरित संख्या वजा करूया
७३९-१८ = ७२१
७२१ संख्येला ७ भागू
७२१/७ = १०३
७२१ या संखेला ७ ने पूर्ण भाग जातो म्हणून ७४०७८२ या संखेला देखील ७ ने पूर्ण भाग जातो.
---------------------------------------------------------------
# ८ ची कसोटी (Divisibility By ८):-
जर दिलेल्या कोणत्याही संखेच्या शेवटच्या तीन अंकाला म्हणजेच एकक दशक आणि शतक स्थानापासून तयार झालेल्या तीन अंकी संख्येला जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला देखील ८ ने पूर्ण भाग जातो.
उदा: ३८४१६
आता या संख्येतील शेवटची तीन अंक म्हणजे ४१६
या संख्येला ८ ने भागीतले असता ४१६/८ = ५२ या संख्येस ८ ने पूर्ण भाग जातो म्हणून ३८४१६ या संखेला देखिल ८ ने पूर्ण भाग जातो.
-------------------------------------------------
# ९ ची कसोटी (Divisibility By ९):-
जर दिलेल्या संख्येच्या बेरजेला ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला देखील ९ ने पूर्ण भाग जातो.
उदा: ५३,४८,४२१
दिलेल्या संख्येच्या पूर्ण अंकांची बेरीज करू
५+३+४+८+४+२+१ = २७
आता येणारे उत्तर २७ आहे या २७ ला ९ भागीतले असता २७/९ = ३
२७ ला ९ ने पूर्ण भाग जातो म्हूणून दिलेल्या संखेला देखील ९ ने पूर्ण भाग जातो.
-------------------------------------------------
# १० ची कसोटी (Divisibility By १०):-
ज्या अंकाच्या शेवटी म्हणजे एकच स्थानी ० हा अंक असतो त्या संख्येला १० ने पूर्ण भाग जातो
उदा: ४५०, ८९०, ८७५०, ५४००, ५५४०
वरील सर्व संख्यांच्या एकक स्थानी ० हा अंक आहे म्हणून ह्या सर्व संख्यांना १० ने पूर्ण भाग जातो
-------------------------------------------------
# ११ ची कसोटी (Divisibility By ११):-
जर दिलेल्या संख्येतील समस्थानाची बेरीज आणि विषमस्थानाची बेरीज ही ० किंवा ११ च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला ११ ने पूर्ण भाग जातो.
उदा: ७५६५८
दिलेल्या संख्येचा समस्थानच्या संख्या व त्यांची बेरीज - ५+५ =१०
दिलेल्या संख्येचा विषमस्थानच्या संख्या व त्यांची बेरीज - ७+६+८ = २१
आलेल्या दोन्ही उत्तराची वजाबाकी केल्यास - २१-१०=११
उत्तर ११ आले म्हणून या संख्येस ११ ने पूर्ण भाग जातो.
- -------------------------------------------------------
# १२ ची कसोटी :-
– ज्या संख्येला ३ ने आणि ४ ने भाग जातो म्हणून त्या संख्येला १२ ने पूर्ण भाग जातो.
--------------------------------------------------------
# १५ ची कसोटी :-
– ज्या संख्येला ५ आणि ३ ने भाग जातो म्हणून त्या संख्येला १५ ने पूर्ण भाग जातो.
---------------------------------------------
# १६ ची कसोटी :-
– ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना १६ ने भाग गेल्यास त्या संख्येला पण १६ ने भाग जातो.
-------------------------------------------------------
# १८ ची कसोटी :-
– ज्या संख्येला २ आणि ९ ने भाग जातो त्या संख्येला १८ ने भाग जातो.
-
सरासरी :-
- सरासरी म्हणजे दिलेल्या घटक संख्यांची बेरीज भागिले एकूण घटक.
- सरासरीला मध्यमाने असे म्हणतात.
- उदा. १,२,५,७,१० या संख्यांची सरासरी =
- संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या
= (१+२+५+७+१०) भागिले ५
= २५ भागिले ५
= ५
---------------------------------------------------------------------------
-
जर दिलेल्या घटक क्रम संख्या क्रमवार असतील.
आणि त्यांची संख्या विषम असेल. तर मधली येणारी संख्या ही सरासरी असते.
उदा. 1) ३,५,७,९,११ या संख्यांची सरासरी ७ आहे. ७ ही या गटातील मधली संख्या येते.
दिलेल्या उदाहरणात क्रमवार विषम संख्या आहेत. व त्यांची संख्या ५ ही विषम संख्या आहे, म्हणून सरासरी ७ येते.
२) १,२,३,४,५,६,७,८,९ या संख्यांची सरासरी ५ येईल.
कारण सदर संख्या क्रमवार आहेत. त्यांची एकूण संख्या ९ आहे. त्यांच्या मधील संख्या ५ आहे. म्हणून सरासरी ५ आहे.
------------------------------------------------
-
जर दिलेल्या घटक संख्या क्रमवार असेल आणि त्यांची संख्या सम असेल. तर त्यांची सरासरी ही मधल्या दोन संख्यांच्या सरासरी एवढी येते.
उदा. १) ३,५,७,९,११,१३ यांची सरासरी ?
दिलेल्या उदाहरणात क्रमवार विषम संख्या आहेत. व त्यांची संख्या ही ६ सम संख्या आहे, म्हणून सरासरी (७ + ९) भागिले २ = ८
२) १०,१२, १४, १६,१८,२० यांची सरासरी ?
दिलेल्या उदाहरणात क्रमवार सम संख्या आहेत. व त्यांची संख्या ही ६ सम संख्या आहे, म्हणून सरासरी (१४ +१६ ) भागिले २ = १५